top of page

Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union's members will be Zero Police - Abhijeet Rane

धडक रिक्षा चालक मालक होणार झिरो पोलीस

महिलांच्या सुरक्षिततेसाठी धडक ऑटो रिक्षा चालक मालक युनियनचे एक पाऊल

अभिजीत राणेंच्या संकल्पनेतून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

आरे पोलीस ठाण्याच्या ज्योती देसाई यांच्याकडून संपूर्ण सहकार्याचे, संरक्षणाचे आश्वासन

मुंबई

साकीनाका बलात्काराची घटना ही मन सुन्न करणारी आहे. वारंवार घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांमुळे महिला वर्गात असुरक्षितता निर्माण झाली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी निर्भया पथकाची प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापना करण्याचे आदेश जरी दिले आहेत. या अनुषंगाने रिक्षा चालकांनी झिरो पोलीस ही भूमिका साकारत पोलिसांना सहकार्य करावे यासाठी विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी धडक ऑटो रिक्षा चालक मालक युनियनचे नेतृत्व स्वीकारलेल्या रिक्षा चालक-मालकांसाठी आरे पोलीस ठाण्यात विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात अभिजीत राणे यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई मॅडम, वरिष्ठ पोलीस गौतम बडे, पोलीस निरीक्षक वाल्मिक पाटील यांची उपस्थिती आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले.

साकीनाका येथे ३० वर्षीय महिलेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर मुंबईत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साकीनाका घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात निर्भया पथक नेमण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी दिले आहेत. महिलांची सुरक्षितता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. यात आपलाही खारीचा वाटा असावा या हेतूने विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी धडक ऑटो रिक्षा युनियनचे सदस्यत्व घेतलेल्या रिक्षा चालक-मालक आणि पदाधिकाऱ्यांसाठी ही संकल्पना राबवली.

मीटिंग दरम्यान सर्वांना महिला सुरक्षिततेबाबत योग्य ते मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. रिक्षाचालक ज्या ज्या परिसरात रिक्षा चालवतात त्या त्या परिसरात जर एखाद्या महिलेबरोबर अनुचित प्रकार घडत असताना दिसल्यास त्या संदर्भातील माहिती स्थानिक पोलिसांना कळवावी, एखादा व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना आढळत असल्यास झेरॉ पोलीस बनून पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे. आमचे संपूर्ण संरक्षण रिक्षाचालकांना असेल, जराही घाबरण्याची गरज नाही असे आश्वासन यावेळी आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आरे पोलीस ठाण्याजवळ असलेल्या छोट्या काश्मिरजवळ करण्यात आले होते. या शिबिराला धडक ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे सभासद, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रिक्षा चालकांनी उपस्थित केलेल्या शंकांना समाधानकारक उत्तरे त्यांना देण्यात आली. अभिजीत राणे यांच्या हस्ते ज्योती देसाई यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. तर उपस्थितांना मास्कचे वाटप करण्यात आले.
















57 views0 comments
bottom of page